मराठा, रजपूत, प्रभू, ब्राह्मण व सारस्वत इत्यादी काही स्वतः स श्रेष्ठ म्हणविणाऱ्या जातींच्या लोकांतील विधवांचे जे हाल होतात व त्यांना पतीवाचून जे आमरण गुलामगिरीत डांबून ठेवण्यात येते, त्याचे वर्णन करण्याची काही आवश्यकता नाही.
एक पती मरण पावला असता त्या विधवेने मरेपर्यंत संन्यासवृत्तीने रहावे आणि पुरुषाने मात्र एकाच वेळी किंवा एकामागून एक अनेक बायका केल्या तरी हरकत नाही. एवढेच नव्हे तर स्मशानभूमीच्या पंथास लागलेल्या एखाद्या आजोबाने एखाद्या अल्लड अशा तरुण मुलीशी पतिपत्नीत्त्वाचे नाते जोडावे,
या अन्यायाची ज्योतिरावांना मोठी चीड येई. हा हिंदुधर्मास एक मोठा कलंक आहे असे ते नेहमी म्हणत असत. स्रीजातीवरील हा अन्याय दूर व्हावा म्हणून समाजात पुनर्विवाहाची चाल रूढ झाली पाहिजे,
याकरता त्यांनी मोठा प्रयत्न केला आणि त्यांच्या परिश्रमाने इ० स० १८६४ साली पुण्यास गोखल्यांच्या बागेत शेवटी शेवणी जातीत रघुनाथ जनार्दन व नर्मदा या दोघांत महाराष्ट्रातील पहिला पुनर्विवाह घडून आला व पुढे ही पुनर्विवाहाची चाल चोहोकडे हळूहळू रूढ होऊ लागली!
पण एवढयाने त्यांचे समाधान झाले नाही, कारण काही विशिष्ट जातीच्या लोकांत तो सर्रास सुरू होणे बऱ्याच कालावधींचे काम आहे हे ते जाणून होते.
नेहमी शेकडो तरुण विधवांचे आडमार्गाने पाऊल पडून त्या गरोदर होतात आणि तसे झाले म्हणजे त्या व त्यांचे आप्तलोक जननिंदेच्या भीतीने गर्भनाश करतात; आणि ते न साधल्यास बाळंत झाल्यावर जन्मलेल्या अर्भकाच्या नरडयास नख देऊन त्यास ते रात्री-बेरात्री गल्लीत अगर बोळात फेकून देतात.
असा अनर्थ त्यांच्या हातून घडू नये म्हणून ज्योतिरावांनी इ० स० १८६३ सालचे सुमारास आपल्या घराशेजारी स्वतः च्या खर्चाने एक वाडा बांधला आणि विधवा बायांनी गुप्त रीतीने येऊन व बाळंत होऊन, तेथे मूल ठेवून जावे, अशी सोय केली.
त्यावेळीं या घराचा नंबर३९५ हा होता. तेव्हा “कोणा विधवेचे अज्ञातपणाने वाकडे पाऊल पडून ती गरोगर झाली तर तिने रा. ज्योतिरावांनी स्थापन केलेल्या गृहात गुप्तपणे येऊन बाळंत होऊन जावे " अशा मोठमोठ्या अक्षरांच्या जाहिराती साऱ्या पुणे शहरात भिंतीवर लावण्यात आल्या.
पण या सत्कृत्याचे फळ म्हणून, छळ, त्रास, अपमान व उपहास या महात्म्याच्या वाट्यास आला. गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी, रा. भांडारकर, रा. ब. मदन श्रीकृष्ण, रा. नवरंगे, रा. परमानंद व रा. तुकाराम तात्या पडवळ, या सद् गृहस्थानी वरील कामी ज्योतिरावांना बरीच मदत केली.
ज्योतिरावांचे हे बालहत्त्याप्रतिबंधकगृह प्रस्थापित झाल्यामुळे पुण्यातील ३०-४० अर्भके काळाच्या दाढेतून बचावली गेली. पण पुढे त्यांतील बहुतेक मुले जास्त दिवस जगली नाहीत.
त्याच बालहत्त्याप्रतिबंधक गृहात एका काशीबाई नामक ब्राह्मण विधवेच्या पोटी सुमारे इ. स. १८६५ साली ज्योतिरावांचे दत्तकपुत्र यशवंतराव यांचा जन्म झाला.
ज्योतिरावांचे बालहत्त्याप्रतिबंधक गृह पुढे ८-१० वर्षे सुरळीत चाललेले पाहून (पुढे रा. ब.) महादेव गोविंद रानडे व लाल शंकर उमीशंकर या उभय मित्रांना असल्या एका गृहाची मोठीच आवश्यकता दिसून आली आणि त्यांनी त्या धर्तीवर पंढरपूर येथे एक बालहत्त्याप्रतिबंधक गृह पुढे स्थापन केले.